दिवाळी च्या भेटवस्तू महिला बचत समूहांकडून खरेदी कराव्यात; योगेश कुंभेजकर

NAGPURZP    21-Oct-2021
Total Views |
नागपूर दि.२०- दिवाळी हा सर्व भारतीयांचा मोठा आणि हर्षोल्हासात साजरा केला जाणार सन आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात. या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित महिला बचत समूहांनी निर्मित केलेले साहित्य खरेदी करावे आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकसित होण्याला हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नागपूर जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.योगेश कुंभेजकर यांनी उद्योग क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्राला केले आहे.
 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांची व्यापक चळवळ अत्यंत प्रभावीपणे जिल्ह्यात राबविली जात आहे. गरिबी निर्मूलनाचे ध्येय असलेल्या या राष्ट्रीय ध्वजांकित कार्यक्रमात ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटीत केले आहे. अभियानात महिलांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यात आलेले आहे. अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला अनेक प्रकारच्या हस्तकलेतून वस्तूंची निर्मिती करतात. या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून अभियानाकडून सातत्याने प्रयत्न होत असतात.
 
दिवाळीनिमित्त उद्योग क्षेत्रात आणि बँकिंग क्षेत्रात भेटवस्तू, सुकामेवा आणि फराळाच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. या भेटवस्तू आणि साहित्य महिला बचत गटांकडून खरेदी करून या महिलांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत मिळेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला केले आहे. बचत गटाच्या महिलांनी निर्मिती केलेल्या वस्तूच्या उपलब्धतेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथील जिल्हा व्यवस्थापक अमोल बाविस्कर यांच्याशी ७७९८८०२२७५ या क्रमांकावर संपर्क साधावा. वस्तूंची यादी आणि त्याबद्दल सविस्तर माहिती अभियानाच्या उमेद नागपूर या फेसबुक पेजवर उपलब्ध असेल. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या उपलब्धतेसाठी समन्वय ठेवला जाणार आहे.
 
प्रति, मा.संपादक सो,
कृपया आपल्या प्रसिद्ध दैनिकातून वृत्त प्रसिद्ध करून सहकार्य करावे.
आपला विश्वासू - अमोल बाविस्कर (जिल्हा व्यवस्थापक - विपणन आणि ज्ञान व्यवस्थापन विभाग) 7798802275
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नागपूर (जिल्हा परिषद)